लखनौ : वृत्तसंस्था – योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करायला जायच्या आधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक सभाही घेतली. गोरखपूरचे पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गोरखपूर शहरी जागेवर 3 मार्च रोजी मतदान होणार आहे.
आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांची शिल्लक आणि बचत यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांनी असेही घोषित केले की, त्यांच्याकडे 12 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल फोन, एक लाख रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किमतीची रायफल आहे.
प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की योगी आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि 10 ग्रॅम वजनाचे रुद्राक्ष गळ्यातील दागिने आहेत.त्यांच्या प्रतिज्ञापत्रात योगी आदित्यनाथ यांनी आर्थिक वर्ष 2020-21मध्ये 13 लाख 20 हजार 653 रुपये, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 15लाख 68 हजार 799 रुपये उत्पन्न, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 18 लाख 27 हजार 639 रुपये उत्पन्न आणि आर्थिक वर्ष 2017-18 साठी 14 लाख 38 हजार 670 रुपये उत्पन्न घोषित केले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्याकडे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार कोणतीही कृषी किंवा अकृषिक मालमत्ता नाही. त्याच प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नाही किंवा त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही.योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याविरुद्ध कोणतेही प्रलंबित गुन्हेगारी खटले नाहीत.