जळगाव, प्रतिनिधी । आपले मौखिक आरोग्य आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी मदत करीत असते. त्यासाठी नियमित दंत तपासणी करणे महत्वाचे ठरते. “निरोगी शरीर, उत्तम मन, उत्तम आचरण” हा मंत्र मौखिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतशल्यचिकित्सा विभागातर्फे मौखिक आरोग्य दिनानिमित्त रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दोन्ही उप अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे व डॉ.किशोर इंगोले, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.संपदा गोस्वामी उपस्थित होते.
प्रस्तावनामध्ये विभाग प्रमुख डॉ. इम्रान पठाण यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. दिपप्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर डॉ. मारोती पोटे, डॉ.संपदा गोस्वामी यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. असंसर्गजन्य रोग विभाग समन्वयक स्वप्नजा तायडे यांनी कर्करोगाविषयी माहिती दिली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक वितरण झाले. रांगोळी स्पर्धेत ८ विद्यार्थ्यांनी तर पोस्टर स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मौखिक आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मौखिक आरोग्य उत्तम असेल तर आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहता येते. मौखिक आरोग्य चांगले नसेल तर कोरोना, कर्करोग तसेच अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी दंत तपासणी करून घ्यावी. याबाबत आज स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी देखील उत्तम संदेश दिले आहेत, असेही ते म्हणाले.
स्पर्धेचे परीक्षण सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रुतिका बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन दंत आरोग्य तज्ज्ञ सूर्यकांत विसावे यांनी तर आभार डॉ.मोनिका देसाई यांनी मानले. यशस्वीतेसाठी कनिष्ठ निवासी डॉ. सतीश सुरळकर, तंत्रज्ञ क्षितिज पवार, निशा कटरे, रुचिका साळुंके, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी परिश्रम घेतले.