जळगाव, प्रतिनिधी । गेल्या 26 जानेवारी 2022 रोजी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2022 अतंर्गत ‘आजादी का अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून राजपथावर भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्य दाखविले गेले. यात शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेची सीनिअर अंडर ऑफिसर सोनाली विकास पाटील (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) हिने महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधित्व करीत पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरमध्ये गार्ड कमांडर म्हणून मानवंदना दिली.
यामुळे तिला संरक्षण मंत्रालयातर्फे प्रथम गार्ड कमांडर म्हणून सन्मानित करण्यात आले. सोनालीच्या रूपाने जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय तसेच जिल्ह्याला हा प्रथमच बहुमान मिळालेला आहे. ही समस्त जळगावकरांसाठी गौरवपर आणि अभिमानास्पद बाब आहे.
समस्त जळगावकरांच्या वतीने महापालिकेतर्फे आज शुक्रवार, दि.4 फेब्रुवारी 2022 रोजी नूतन मराठा महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सोनाली पाटील हिचा तसेच तिच्या आई-वडिलांचा जळगाव शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यात सुरूवातीला त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनही करण्यात आले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, लेफ्टनंट कर्नल पवनकुमार, लेफ्टनंट शिवराज पाटील, सीटीओ श्रीमती हेमाक्षी वानखेडे आदींसह नूतन मराठा महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.