सातारा, वृत्तसंस्था । कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे त्यांची चौकशी करून नंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने दाखल घेतली आहे. बंडातात्या यांचे विधान संतापजनक असून महिलांच्या आत्मसन्माला धक्का बसला आहे.
दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी याची दखल घेऊन कडक कारवाई करावी. तसेच याचा अहवाल दोन दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
काल साताऱ्यात वाईन विक्री निर्णयाविरोधात वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी खा. सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.
बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परवानगी नसताना बेकायदेशीर आंदोलन करणे, कोविडचे नियम न पाळणे, मास्कबाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, भडकाऊ भाषण केल्याचीही नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. “ज्ञानोबा तुकाराम बंड्याचं डोकं ठिकाणावर आण” ओव्या म्हणत राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये आंदोलन ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन महाराष्ट्रामधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गुरुवारी बंडातात्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबरोबरच भाजपाच्या माजी आमदार पंकजा मुंडेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणामध्ये आज सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे. पुण्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने किर्तनामध्ये गातात त्याप्रमाणे अभंगातील ओव्या गाऊन बंडातात्यांविरोधात आंदोलन केलं.
“ज्ञानोबा तुकाराम बंड्याचं डोकं ठिकाणावर आण”, “बंड्यातात्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंड्यातात्यांविरोधात आंदोलन केलं. “वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या बंड्यातात्याचा धिक्कार असो”, “वारकरी संप्रदायाला डाग लावणाऱ्या बंड्यातात्याचा धिक्कार असो,” अशी घोषणाबाजीही यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. बंड्यातात्या हाय हाय, अशी घोषणाबाजीही यावेळेस करण्यात आली. “नाठाळ बंड्या.. चाठाळ बंड्या” म्हणत बंड्यातात्यांनी महिला नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी बंड्यातात्यांच्या फोटोला चपलाही मारल्या. गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला होता.