जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्करोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहे. आतापर्यत ३ स्तनांच्या, २ तोंडाचा कर्करोगाच्या तर १ कर्करोगसदृश्य शस्त्रक्रिया पूर्ण होऊन रुग्णांना यशस्वीपणे रुग्णालयातून निरोप दिला आहे. शरीरामध्ये कुठे गाठी असतील किंवा कर्करोग असल्याचा संशय असेल तर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.
शुक्रवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस आहे. त्या निमित्ताने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. येथील शल्यचिकित्सा व दंतशल्यचिकित्सा विभागातर्फे कर्करोगाच्या विविध शस्त्रक्रिया दररोज पार पडत आहेत. कोरोना महामारीमुळे वर्षभरानंतर कर्करोग शस्त्रक्रिया सुरु झाल्या आहे.
शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा कर्करोग तज्ज्ञ डॉ.मारोती पोटे यांच्या विभागाने जिल्ह्यातील तीन महिलांची ‘ट्रू कट बायोप्सी’ द्वारे स्तन कर्करोग चाचणी करण्यात आली. त्यानुसार कर्करोगाचे निदान झाल्यावर त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. विभागात ३ स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. तर एका व्यक्तीला कर्करोग सदृश्य पोटाचा आजार होता. त्याची शस्त्रक्रिया करून त्याला दिलासा दिला आहे. आणखी दोन रुग्णांच्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत.
दंतशल्यचिकित्सा विभागात देखील तोंडाच्या कर्करोगाच्या २ अवघड शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. विभागप्रमुख डॉ.इम्रान पठाण व त्यांच्या विभागाने सातत्याने २ रुग्णांचे गुटखा, तंबाखू खाऊन खराब झालेल्या तोंडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कर्करोगाच्या लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत.
ज्या नागरिकांना कर्करोगाची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ओपीडी काळात कक्ष क्रमांक ११६ येथे तपासणीसाठी यावे असे आवाहनदेखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.