मुंबई, वृत्तसंस्था । शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील एका सोन्याच्या दुकानात चोरट्यांनी टाकलेल्या धाडसी दरोड्याची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. चोरट्यांनी तब्बल आठ कोटी रुपये किंमतीचे सोने लंपास केले होते विशेष म्हणजे केवळ एका फोन कॉलमध्ये आरोपींपर्यंत पोलिस जावून धडकले. 15 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून आरोपींच्या मुसक्या ल.टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांनी आवळल्याची माहिती मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परीषदेत दिली.
मुंबईच्या एल.टी.मार्ग पोलिस ठाण्यात 14 जानेवारी रोजी भुलेश्वरमधील एका ज्वेलरी दुकानातून तेथील कर्मचारी गणेश एचके देवासी आणि इतर 4 जणांनी 8.19 कोटी रुपयांचे तब्बल 17.4 किलो सोने सोने चोरी केले होते. तसेच, 8.57 लाख रुपयांची रोकडही पळविण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर, पोलिसांनी या धाडसी चोरीचा तपास सुरू केल्याने पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून 89% मालमत्तेची वसुली करण्यात आल्याचे विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
सोन्याचे व्यापारी टामका यांच्या दुकानात काम करणार्या एका कामागारानेच या चोरीचा कट रचला आणि मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचं तपासात उघड झालं आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी या तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
आरोपी ओला कारद्वारे बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून पालनपूरला पोहोचले. तेथून पुन्हा वाहन बदलून त्यांनी रेवधर गाठले. तेथून सिरोही अबू रोड येथील गोशाळेमध्ये दागिन्यांचे वाटप केले. यामध्ये गणेशने स्वतःसाठी 7 किलो सोन्याचे दागिने ठेवले तर प्रजापतीला 2 किलो दागिने दिले. तसेच अन्य आरोपींना हातात येईल तसे कमी-जास्त दागिने आणि पैसे देण्यात आले होते. तेथून प्रजापतीने त्याच्या सिरोहीतील पडीक शेतजमिनीत 6 ते 7 फूट खोल खड्डा खणत ते दागिने लपवले व तेथून ते पसार झाले. प्रजापती हाती लागल्यानंतर पथकाने शेत जमिनीतून 9 किलो दागिने हस्तगत केले.
चोरट्यांनी एकमेकांशी थेट मोबाईलद्वारे कॉल न करता हॉटस्पॉटवरून व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे कधी वाहन चालकाच्या तर, कधी हॉटेलमधील वेटरच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याची शक्कल वापरली होती. मात्र, यातील एकाने नातेवाईकाला कॉल केला आणि त्यांचा लपाछपीचा खेळ संपला. पोलिसांनी याच मोबाईल लोकेशनवरून त्यांचा बिकानेर ते इंदौरपर्यंत सुमारे 14 तासांचा अथक पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींनी शेतात लपवलेल्या ९ किलो सोन्यासह एकूण 15 किलोचे दागिने हस्तगत करण्याची कामगिरी पोलिसांनी बजावली आहे.