पुणे, वृत्तसंस्था । पुण्यातील शाळा, कॉलेज 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांना लस घेणं बंधनकारक आहे. ‘शाळा, कॉलेजमध्ये लसीकरण करणार आहोत, असंही पवार यांनी सांगितलं. मंत्रिमंडळात मास्क मुक्तीबाबत चर्चा नाही. त्यामुळे मास्क घालणं बंधनकारक आहे. इयत्ता पहिली ते 8 वीपर्यंतची शाळा दुपारी 4 पर्यंतच सुरू राहिल. दुपारी विद्यार्थ्यांनी घरी जाऊनच जेवण घ्यावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मास्क काढूच नये हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे. इयत्ता पहिली ते 8 वी हाफ डे आणि नववी ते दहावी पूर्णवेळ शाळा सुरू राहील, असंही ते म्हणाले.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं शाळांमध्येच लसीकरण केले जाणार आहे, तसे आदेश संस्था चालकांना देण्यात येणार आहेत. लसीकरण कसे करायचे शाळा चालक आणि संचालकांना आज कळवण्यात येणार आहे. पहिली ते आठवीच्या शाळा आठवडाभर हाफ डे असतील. त्यानंतर आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणं बंधनकारक नाही. ते पालकांवर अवलंबून आहे. आम्ही पालकांना जबरदस्ती करणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.