जळगाव, प्रतिनिधी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनी जिल्हाभरात विविध तालुकास्तरावर गावा- गावा मध्ये 135 ठिकाणी अभाविपतर्फे तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सपूर्ण जिल्हाभरात प्रजासत्ताक दिनापासून ते आगामी काळात 30 जानेवारी पर्यंत १७५ पदयात्रा काढण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर अभाविप जळगाव मध्ये १७५ तिरंगा पदयात्रा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिवसभरामध्ये अभाविपतर्फे जळगाव जिल्ह्यात विविध तालुका तसेच विविध ग्रामीण भागात 135 तिरंगा पदयात्रा काढण्यात आल्या. जळगाव, धरणगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, खेडी, हरेश्वर पिंपळगाव, कानळदा,विद्यापीठ आदी गावांमध्ये प्रत्यक्ष कार्यकर्त्यांनी जाऊन तिरंगा पदयात्रा करण्यात आली. दिवस भरामध्ये १०२ गावांमध्ये पदयात्रा करण्यात आली. अमृतमहोत्सवानिमित्त देशभक्तीपर वातावरण तयार करून गावागावांमध्ये जाऊन वाड्या-वस्त्यांवर अभाविपतर्फे तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. तसेच भारत माता पूजन, अभिवादन करून मानवंदना देण्यात येवून आणि पदयात्रेचा शेवट हा वंदे मातरम, राष्ट्रगीत घेऊन करण्यात आला. प्रत्येक समारोपाच्या ठिकाणी अभाविप कार्यकर्त्यां मार्फत अमृतमहोत्सवानिमित्त भाषण देण्यात आले. अभाविपने केलेल्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाची योजना सांगण्यात आली. तसेच स्वातंत्र्य सेनानींच्या देशसमर्पणाच्या कार्याला उजाळा देण्यात आला. तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून जळगाव जिल्हात ५८९३ नागरिक सहभागी झाले होते. यात विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, डॉक्टर,वकील, नागरिक, गावकरी, सैन्य दलातील जवान, तसेच प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींचाही सहभाग होता. या पदयात्रेत शासन निर्देशानुसार सद्यस्थितीत कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत मर्यादीत स्वरूपात सदस्यांनी सहभागी होउन पदयात्रा यशस्वी करण्यासाठी अभाविपच्या पदाधिकारी सदस्यांनी सहकार्य करीत परिश्रम घेतले.