मुंबई, वृत्तसंस्था । भाजपा नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नातीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या पेशाने डॉक्टर होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ती आपला पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत राहत होती.
सौंदर्याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तिच्यासोबत तिच्यासोबत काम करणारे एक डॉक्टरही राहत असल्याचं जनसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही सुसाईड नोट हाती आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजे शुक्रवारी सकाळी सौंदर्या मृतावस्थेत आढळली.
मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी सौंदर्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा हिची मुलगी होती. सौंदर्याच्या मृत्यूची बातमी कळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या कॅबिनेट सहकाऱ्यांसह येडियुरप्पा यांच्या सांत्वनासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.