नवी दिल्ली, । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री जागतिक आर्थिक परिषदेच्या अजेंडा बैठकीत भाषण केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगाला आशेचा पुष्पगुच्छ दिला असल्याचं म्हटलं. तसंच भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे असं म्हणत त्यांनी गुंतवणुकदारांना आवाहनही केलं. दरम्यान, व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या भाषणावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. यावेळी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावे लागले. यामुळे विरोधी पक्ष तसेच अनेक नेटकऱ्यांनी याची खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधान मोदी हे नेहमी त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे चर्चेत असतात. मात्र दावोसमध्ये झालेल्या भाषणावेळी टेलिप्रॉम्पटरमध्ये तांत्रिक अडचणीमुळे व्यत्यय आल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा मोदींना भाषण अचानक थांबवावं लागलं आणि त्यांचा काही क्षण गोंधळही उडाला. तेव्हा मोदींनी आलेला रागही आवरल्याचं दिसतं. आपल्या डाव्या बाजुला बघून त्यांनी दोन्ही हातही वर केले होते. त्यानंतर कानात हेडफोन घालून समोर असलेल्यांना ऐकू येतंय ना असा प्रश्न विचारला. यावेळेत टेलिप्रॉम्पटर पुन्हा सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांचं भाषण पहिल्यापासून सुरु केलं.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून शेअर करताना टीकाही केली आहे. त्यावरून टोला लगावताना सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘भारतीयांची प्रतिभा सोडा, मोदींची प्रतिभा बघा’ असं म्हणत सचिन सावंत यांनी ट्विटरवरून मोदींचा लाइव्ह भाषणात टेलिप्रॉम्पटर बंद पडल्यानं व्यत्यय आला तेव्हाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या प्रकारावरून काँग्रेसनं टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हमे तो टेलिप्रॉम्पटरने लूटा, अपनो में कहा दम था असं म्हणत निशाणा साधण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या प्रतिभेचं कौतुक या परिषदेच्या भाषणात केलं. तसेच राहुल गांधी टीका करत म्हणाले की, इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।. #TeleprompterPM असा हॅशटॅग वापरून अनेक नेटकऱ्यांनी या प्रकारची खिल्ली उडवली आहे.