जळगाव (प्रतिनिधी) – रिंग रोड येथे शनिवारी पहाटे बहिणाबाई उद्यानाकडे जाणाऱ्या मार्गावर ५०० मि.मी. जलवाहिनी फुटल्याने व जुन्या लाइनला तडा गेल्याने वेल्डिंगचे काम करावे लागणार असल्याने शनिवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला हाेता.
रविवारी सायंकाळपर्यंत काम पूर्ण न झाल्याने दिवसभर नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागली मात्र आज सोमवारी पाइपलाइनचे पूर्ण होईल. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येताे. शनिवारी रिंग राेडसह गणेश काॅलनी व परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार हाेता. पहाटे चार वाजेच्या सुमारास रिंग राेडवर मुख्य जलवाहिनीला तडा गेला. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने गळती शाेधण्यााठी सकाळी ११ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरूच ठेवला हाेता.
त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत काही भागात पुरवठा झाला. त्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागली. शनिवारचा पाणीपुरवठा रविवारी हाेईल अशी अपेक्षा हाेती. परंतु, वेल्डिंगचे काम दुपारपर्यंत सुरूच हाेते.