जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात रविवारी दि. २ जानेवारी रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी रस्ते, ब्लॉकची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर दिसत होता. सोमवारी दि. ३ जानेवारी रोजी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी जनसंपर्क कक्ष पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सकाळी रुग्णालयात जाऊन सर्व कक्षांचा आढावा घेतला. या वेळी दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. डॉक्टर, परिचारिकांशी संवाद साधून रुग्णसेवेबाबत विचारपूस केली. रुग्णालयातील रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत देखील त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांकडून आढावा घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला जनसम्पर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी रोजी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. रविवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी संबंधित विभागाची पाहणी करीत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.
दोन दिवसांपूर्वी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतला. शनिवारी, रविवारी डॉ.रामानंद यांचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालय, रुग्णालयातील विविध विभाग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती. अनेकजण भावनाविवश झाले होते, “आपण आल्याने धीर आला. गेल्या तीन महिन्यात काम करताना प्रोत्साहन न मिळत काही वेळा हेटाळणीला सामोरे जावे लागले” अशा स्वरूपात अनेक डॉक्टर्स, कर्मचारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अधिष्ठाता कार्यालय, बालरोग व चिकित्सा विभाग, शल्यचिकित्सा विभाग, नेत्रशल्यचिकित्सा विभाग, दिव्यांग मंडळ, महात्मा फुले जनआरोग्य योजना विभाग, मानसोपचार विभाग, जीएमसी नर्सिंग स्टाफ, त्वचा विभाग, कक्षसेवक विभाग, रक्तपेढी विभाग, एक्स रे तंत्रज्ञ आदी विभागासह सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटण्यासाठी गर्दी केली होती.