जळगाव – गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जैन हिल्स परिसरात पीस वॉकचे आयोजन केले होते, त्यात शहरातील निवडक नागरीकांनी सहभाग नोंदविला. “आयुष्यात प्रथमच नवीन वर्षाची सुरुवात अतिशय प्रसन्न व सकारात्मकता घेऊन आली” असे मत ‘पीस वॉक‘मध्ये सहभागी झालेल्यांनी व्यक्त केले. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात पंचमहाभूत तत्वे आणि मानवी जीवन यांचा अन्योन्य संबंध उलगडत या पीस वॉकचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस सर्व सहभागींचा परिचय करून घेण्यात आला. चार किलोमीटरच्या या वॉकमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि पंचतत्वे आणि मानवी जीवन यांचा संबंध वैज्ञानिक व आध्यात्मिकदृष्ट्या समजावून सांगण्यात आला. पक्ष्यांचा मधुर आवाज, थंड व शांत हवा, भक्ती संगीत आणि चालणाऱ्यांचा उत्साह वाढविणारे जैन हिल्सचे सकाळचे आल्हाददायी वातावरण यामुळे शांतीचा अनुभव सहभागींनी घेतला.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विनजी झाला यांनी कबीराचे दोहे, संत वचने यांची उदाहरणे देत मानवी शरीराचा पंचतत्वांशी असलेला संबंधांचे खास निरुपण या वॉकच्या दरम्यान ठराविक अंतराने केले. सहभागींनी आपल्या प्रतिक्रियेत अशा प्रकारच्या पीस वॉकची आवश्यकता प्रतिपादित केली. जीवनातील शांतीचा सुखद अनुभव घेता आला याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त केले. आगामी काळात जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांना घेऊन पीस वॉकचे आयोजन करावे अशी सूचनाही केली. उद्योजक स्वरूप लुंकड, जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, शरद पाटील, नीलम जोशी, सुनील पवार, जयश्री जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश कुळकर्णी यांनी स्वागत व आभार मानले. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक सपन झुनझुनवाला, शासकीय तंत्र निकेतनमधील प्राध्यापक वृंद आदी उपस्थिती होते.