जळगाव, प्रतिनिधी । गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचे जावई श्री.केंदार वांजपे यांना जळगावातील निष्णात अॅड.अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात मांडलेली बाजू, केलेला युक्तिवाद व केलेल्या अर्जाचा उच्च न्यायालयाने गंभीरपणे सकारात्मक विचार करून श्री.वांजपे यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती श्री.नितीन झांबरे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
न्यायमूर्ती श्री.झांबरे यांनी यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे, की फुरसंगी येथील शेतकर्यांकडून कमी भावात जमीन विकत घेऊन ती ‘डीएसके’ यांच्या कंपनीला जादा भावात विकून त्यात नफा कमविल्याचा आरोप वांजपे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्रात ठेवण्यात आलेला आहे. श्री.वांजपे 2018 पासून कारागृहात असून, ते या प्रकरणात सहआरोपी आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी श्री.वांजपे यांच्या वतीने अॅड.अनिकेत निकम यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे अर्जही केला होता.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील श्री.प्रवीण चव्हाण यांनी श्री.वांजपे यांना जामीन देऊ नये व सकृतदर्शनी त्यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध होतो, असा युक्तिवाद करीत जामीन देण्यासंदर्भात हरकत घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर श्री.वांजपे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केला. या आदेशामुळे अॅड. अनिकेत निकम यांच्या या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.