जळगाव, प्रतिनिधी । विजेत्यांच्या रस्त्यात अडथळे येत राहतात. त्यांच्यापासून बचाव करणे योग्य नसून ते पार करून उद्दिष्टप्राप्ती करण्यात खरा पुरुषार्थ असतो. आयुष्यात पूर्वी जे कधीच केले नाही, ऐकले नाही, त्या अज्ञात विश्वात स्वत:ला झोकून द्या. एखादे काम आपल्याला अशक्य वाटत असेल, तेसुद्धा काम करून पाहा, धैर्याने पाऊल उचलत चला. बंडखोरी वृत्ती जागवा आणि आपल्या कम्फर्ट झोनचा विस्तार करत पुढे जा. नेहमी कम्फर्ट झोनमध्ये राहिलात तर तुमचे यश त्या कक्षांना कधीही भेदू शकणार नाही. तुम्हाला कम्फर्ट झोनच्या भिंती पाडाव्याच लागतील तेव्हाच तुम्ही जीवनात यशाचे शिखर गाठाल. असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र दिन दयाल उपाध्याय योजनेचे संचालक प्रा. डॉ. विवेक काटदरे यांनी जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयामधील प्रथम वर्ष एमबीए व एमसीए या विभागाच्या इंडक्शन कार्यक्रमावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका डॉ. प्रिती अग्रवाल व इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा. मकरंद वाठ, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. अग्रवाल यांनी आपल्या प्रास्ताविकेत नमूद केले की, आपण रायसोनी इस्टीट्यूटचे प्रतिनिधित्व करतो हे आपले भाग्यच आहे, रायसोनी इस्टीट्युट सदैव दर्जात्मक शिक्षण देण्यास आग्रही असते, “जुनून” या इंडक्शन उपक्रमाचा विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व मार्गदर्शकाचे सकारात्मक अनुभव त्याचा प्रॅक्टीकल अभ्यास याने विध्यार्थ्यांना एक नवी वाटचाल मिळेल तसेच आपले संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्वामुळेच आपण यशस्वीरीत्या मार्गक्रमण करू शकतात असे त्यांनी म्हटले यानंतर मेहनत, शिस्त, अभ्यास, मोठ्याचा आदर या विविध मुद्यांवर त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत मार्गदर्शन केले तसेच आपल्या मार्गदर्शन मनोगतात प्रा. डॉ. काटदरे पुढे म्हणाले की, यशाचा मार्ग प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो, तो प्रत्येक विध्यार्थ्याने नेमका समजून घ्यायला हवा व त्यादृष्टीने शिक्षण घेतले तर तुमचे जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण होते. शिक्षणाने माणूस म्हणून तुम्ही घडतात आणि ज्ञानाने तुम्हाला स्वयंपूर्ण व्यक्ती म्हणून जगता येते. शिक्षण हे निरंतर चालू असणारे यंत्र आहे त्यासाठी तुम्ही कोणावर विसंबून राहू नका, खासगी शिकवणी लावण्यापेक्षा स्वयं अध्ययन करा. बहिणाबाई चौधरी या कधीही शाळेत गेल्या नाहीत पण त्या ज्ञानाने परिपूर्ण होत्या. तसेच आपल्या जीवनामध्ये आई-वडील हे पहिले गुरु आणि ज्यांनी शिक्षण देऊन जीवनाला एक परिपूर्ण अर्थ मिळवून दिला ते दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक होय आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ज्ञान व शिक्षणासोबत, क्रीडा व छंद महत्त्वाचे असतात. आयुष्यातील विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने वेगवेगळे खेळ खेळले पाहिजे. जीवन वर्तमानकाळातच जगावे, त्यासाठी शरीराचे व मनाचे आरोग्य उत्तम असले पाहिजे. मनाचे आरोग्य राखण्यासाठी ध्यानधारणा, लक्ष केंद्रित करणे, योगा आदी बाबीचे नियम अंगिकारले पाहिजे. तसेच योग्य आहार, पुरेशी झोप, सकारात्मक वृत्ती, आई वडील व गुरुजन याविषयी आदर हे जीवनाच्या यशाचे गुपित आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीया कोगटा, प्रा. राहुल त्रिवेदी व आभार प्रा. ज्योती जाखेटे यांनी मानले तसेच यावेळी प्रा. कल्याणी नेवे, प्रा. प्रशांत देशमुख व आदी उपस्थित होते.