जळगाव प्रतिनिधी – दाेन वर्षांपासून पगार न मिळालेला मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त असून, उदरनिर्वाहासाठी वृद्ध बापाला माेलमजुरी करावी लागत आहे. मुलाच्या उपचारासाठी तरी पगाराचे पैसे मिळावे म्हणून या मुक्या बापाने गुरुवारी जिल्हा परिषदेत शिक्षण उपसंचालकांना हात जाेडून पगार देण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकारानंतर उपसंचालक नितीन उपासनी यांनी जागेवर समस्या साेडवण्याचे आश्वासन दिले.
शहरातील नाथवाडा येथील रहिवासी राजेंद्र वामन जाेशी हे नूतन मराठा संस्थेत शिपाई पदावर आहेत. सन २०१९मध्ये त्यांची हातेड येथे बदली झाली हाेती. जाेशी त्या ठिकाणी रुजू हाेऊनही त्यांना दाेन वर्षांपासून पगार मिळाला नाही. त्यांना कर्कराेगाने ग्रासले असून, उपचारासाठी पगार मिळावा म्हणून ते जिल्हा परिषदेत वारंवार अर्ज करीत हाेते; परंतु यंत्रणेतील अधिकारी दाद देत नव्हते.
शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे जिल्हा दाैऱ्यावर असल्याने गुरुवारी राजेंद्र जाेशी यांचे वडील वामन जाेशी यांनी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांच्यासह उपासनी यांची भेट घेतली. वामन जाेशी हे मुके असल्याने त्यांना बाेलता येत नसल्याने त्यांनी हात जाेडून शिक्षण उपसंचालकांकडे न्यायाची मागणी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपसंचालक उपासनी यांनी तातडीने जाेशी यांचे थकीत वेतन देण्याचे आश्वासन देत आदेश काढले.