जळगाव, प्रतिनिधी । कोव्हिड – 19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online Web Portal विकसित केले असुन, त्याव्दारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वेबसाईट वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm ही देखील लिंक देण्यात आली आहे.
अर्जदारास, त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशिल जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशिल (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड -19 मुळे मृत्युची नोंद झालेली आहे. अशा व्यक्तींच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्राची मागणी न करता मंजुर करण्यात येईल. इतर प्रकरणी कोव्हिड-19 मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Certificate Cause of Death) असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजुर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड – 19 मुळे मृत्यु झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत सादर करावी लागतील
जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हास्तर/ महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व यासमितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.
अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहील सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरीता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.