चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील हिरापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ काल (दि. १ डिसें) रात्री अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने धावणारी क्रुझर गाडीवरील चालकांचा ताबा सुटल्याने गाडी क्रमांक एम. एस. १६/ए ५६०४ ही कुझर उलटून त्यात तीन मजूर जागीच ठार तर ९ जण जखमी झाले.
या अपघातामध्ये नाना भास्कर कोळी, विकास जुलाल तडवी, मुख्तार तडवी सर्व रा. डोंगरगाव ता. पाचोरा हे जागीच ठार झाले, तर गाडीतील वंदन तडवी, चंदन हरीष पाटील, समाधान पाटील, नितीन पाटील, दिलीप तडवी, समीर राजू तडवी यांच्यावर चाळीसगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असतांना त्यातील विनोद तडवी, चंदन हरीष पाटील, समाधान पाटील या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.
सदरची क्रुझर ही मनमाडहून पाचोरा येथे येत असतात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावापासून काही अंतरावर चाळीसगावकडे येत असतांना महादेवाच्या मंदिराजवळ हा अपघात झाला. या अपघाताची माहिती हिरापूर व खडकी गावातील काही तरुणांना समजताच तरुणांनी अपघात स्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.
तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना माहिती मिळताच ताबडतोब अपघात स्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. या क्रुझर गाडीत सर्व जण पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील एकूण बारा मजूर होते, अशी माहिती मिळाली आहे.