जळगाव, प्रतिनिधी । मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस बॉईज च्या जिल्हा संघटनेतर्फे शुक्रवारी सकाळी काव्य रत्नावली चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय पर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे, संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांच्या उपस्थितीत रॅली चा शुभारंभ झाला.
ही रॅली काव्य रत्नवली चौक, आकाश वाणी चौक, स्वातंत्र चौक, नवीन बसस्थानक मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील शहीद स्मारक जवळ आली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कान डे यांच्या उपस्थितीत शहीद पोलीस, जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबईतील २६/११ च्या हल्यातील शहीद पोलिसांच्या शौर्याची माहिती राहुल सूर्य वंशी यांनी विशद केली. मुंबईतील दहशतवादी हल्यात पोलिसांनी जीवाची बाजी लावत अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिकच उजळली, असेही त्यांनी सांगितले. पोलीस बॉईज संघटनेच्या विविध कार्य, उपक्रमांची माहिती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी दिली. तसेच योग्य कामात पोलिसांना कायम साथ देण्याचे आवाहन केले. शहीद पोलिसांच्या कुटुंबांच्या परिस्थितीची जाणीव निवेदिता ताठे यांनी करून दिली. या वेळी पोलीस दलातील वायरलेस विभागामधील अमित माळी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष समीर शेख, आरिफ पिंजारी, महानगराध्यक्ष किरण राजपूत, तालुकाध्यक्ष दिलीप साळुंखे, वाहतूक शाखेचे अध्यक्ष रशीद तडवी, उपाध्यक्ष अकील शेख, सईद पिंजारी, भूषण सुरळ कर आदी उपस्थित होते.