जळगाव प्रतिनिधी | अमरावती येथील दंगलीच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत कलम-१४४ (१)(२)(३) अंतर्गत धरणे, मोर्चे आणि आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी याबाबतचे नोटिफिकेशन जारी केले आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सकाळी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात एक दिवसासासाठी जमावबंदीचे निर्देश जारी केले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, जळगांव यांनी दिनांक २१/११/२०२१ रोजीचे पत्रान्वये, विविध राजकीय पक्ष/संघटना यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक २२/११/२०२१ रोजी अमरावती येथे दिनांक १२/११/२०२१ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी तसेच रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी व इतर मागण्याकरीता धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले आहे. सदर धरणे आंदोलनादरम्यान विविध राजकीय पक्ष/संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेकडून आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शासन, प्रशासनास अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा घटकात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. कोणत्याही छोट्याशा घटनेवरुन दोन समाजामध्ये जातीय दंगली होऊ नयेत व शांतता अबाधित राहावी करीता दिनांक २२/११/२०२१ रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार मोर्चा, धरणे आंदोलने यावर बंदी घालण्याकरीता जळगाव जिल्हा घटकाकरीता आदेश पारीत होण्यास विनंती केलेली आहे. आणि ज्याअर्थी, विविध राजकीय पक्ष/संघटना यांच्यातर्फे दिनांक २२/११/२०२१ रोजी होणार्या धरणे आंदोलनामुळे जळगांव जिल्ह्यात दोन समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होऊन समाजात द्वेष निर्माण होऊन दंगलीसारखे गंभीर गुन्हे घडून सार्वजनिक मालमत्तेस धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशी बाब पोलीस अधिक्षक जळगांव माझ्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि ज्याअर्थी, अशा वातावरणात जळगांव जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था भंग होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगल होवू नये व शांतता अबाधीत राहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये जळगांव जिल्हा हद्दीमध्ये मोर्चा, धरणे आंदोलने यावर बंदी घालणे जरुरीचे आहे अशी माझी खात्री झाली आहे. त्याअर्थी, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये मी अभिजीत राऊत, जिल्हादंडाधिकारी जळगांव मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगांव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता दिनांक २२/११/२०२१ रोजी सकाळी ०६.०० वाजेपासून ते २४.०० वाजेपावेतो जळगाव जिल्हा हद्दीमध्ये मोर्चा, धरणे आंदोलने यावर बंदी घालणेबाबत याद्वारे आदेश पारीत करण्यात येत आहे. जळगांव जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणेबाबतचे गांभीर्य लक्षात घेता वेळेअभावी पुरेशी संधी देणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१)(२)(३) अन्वये सदर आदेश लागू करण्यात येत आहे. या प्रकारचे निर्देश आज जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत.