जळगाव – कानळदा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात भाजपची बैठक झाली. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांनी घोषणा केली की,
राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम न भरल्याने शेतकरी बांधवांची दिवाळी अंधारात जाणार असल्याच्या निषेधार्थ ९ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात येणार आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेष पाटील तर प्रमुख उपस्थितांमध्ये किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जि.प. सभापती प्रभाकर सोनवणे, लोकसभा विस्तारक सचिन पान पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य हर्षल चौधरी, माजी विकासो चेअरमन ज्ञानदेव येवले आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, शेतकर्यांनी आपली विम्याची रक्कम वेळेत भरून देखील आपल्या हक्काची विमा नुकसान भरपाई मिळाली नाही कारण राज्य शासनाने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि आपल्या हिस्स्याची विम्याची रक्कम भरली नाही. यामुळे शेतकर्याना नुकसान भरपाई मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाने आपली १२६ कोटी रुपयांची रक्कम भरली असती तर आज शेतकरी बांधवांची दिवाळी अंधारात गेली नसती. यामुळे या राज्य शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात नऊ तारखेला आंदोलन करावयाचे असून आपण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. तर किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे यांनी शेतकरी बांधवांनी आपल्या वर सातत्याने होत असलेला अन्याय आता सहन करायचा नसल्याचे सांगत सरकारवर टीका केली.