चाळीसगाव, प्रतिनिधी । गांजा विक्रीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. राजु पुंडलीक कुमावत (रा.घाटरोड, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
2018 मध्ये मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सौंदाणे, ता.मालेगांव, जि.नाशिक येथे एका दुकानदाराला गांजा विक्री करण्यासाठी जवळ बाळगतांना अटक करण्यात आली होती. या दुकानदाराकडुन सुमारे 5 किलो 748 ग्रँम 31 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात सदर दुकानदाराला राजु पुंडलीक कुमावत ( रा. घाटरोड, चाळीसगाव) याने गांजा आणुन दिल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासुन राजु पुंडलीक कुमावत (रा. घाटरोड, चाळीसगाव) हा पसार होता. आरोपी कोदगाव शिवारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व पुढील कारवाईसाठी आरोपीला मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, अटकेतील आरोपीविरुध्द राजस्थान राज्यात देखील यापुर्वी गांजा पदार्थ विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.