जळगाव,प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व चोपडा येथे अनुक्रमे 23 व 30 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी एक या कालावधीत विशेष दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्यकारी समितीची बैठक मागील महिन्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दिव्यांग तपासणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्य यंत्रणेस दिले होते. त्यानुसार मुक्ताईनगर येथे 23 नोव्हेंबर रोजी, तर चोपडा येथे 30 नोव्हेंबर, 2021 रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.
या शिबिरासाठी डॉ. विजय आर. कुरकुरे, डॉ. अजय बि. सोनवणे (अस्थी रोग तज्ज्ञ), डॉ. प्रवीण पाटील (नेत्र रोग तज्ज्ञ), डॉ. कांचन पाटील (मानसोपचार तज्ज्ञ), डॉ. नितीन विसपुते (नाक, कान, घसा तज्ज्ञ), शैलेंद्र शिरनामे, दौलत निमसे (मानसोपचार तज्ज्ञ) या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.