जळगाव, प्रतिनिधी । जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थांतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले.
पहाटे ४ वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्रीराम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली व प्रभू श्रीरामांच्या जयघोषणात श्रीराम रथोत्सवाला सुरूवात झाली.
रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.