जळगाव, प्रतिनिधी । केशवस्मृती प्रतिष्ठान आणि ग्लोबल सिनर्जाइझर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या पोषण अभियानात १९७ गरजू आणि आदिवासी पाड्यावरील महिलांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. यात गरोदर तसेच स्तनदा मातांचा समावेश होता.
बहुतेकवेळा ग्रामीण भागात महिलांच्या सर्वसाधारण आरोग्याकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षित शारीरिक विकासही अनेकदा खुंटलेला आढळतो.यासोबतच गरोदर आणि स्तनदा मातांना जो अतिरिक्त पोषण आहार द्यायला पाहिजे त्याकडेसुद्धा दुर्लक्ष केले जाते. त्याचा परिणाम ही माता किंवा महिला कुपोषित राहण्यात जसा होतो तसेच तिचे अपत्यही कुपोषित जन्म घेण्यात होऊ शकतो. हे टाळण्यासाठीच मुख्यत्वे या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून यावल आणि रावेर या दोन तालुक्यातील मालोद, वाघझीरा, मानापुरी, गायरान, इचखेडा, खालकोट , कोळवद, डोंगरदे, रावेर, आभोडे या गावांचा या पोषण किट वितरण अभियानात समावेश होता.
शासनातर्फे अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा पोषण आहार हा दैनंदिन स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तूंच्या स्वरूपात असतो. त्यामुळे केवळ गरोदर, स्तनदा मातांना हा लाभ न मिळता घरातील सर्व सदस्यच त्याचा लाभ घेतात. शिवाय ज्यांना असा आहार अधिक मिळणे अपेक्षित असते त्यांनाच तो मिळत नाही. साधारणपणे एक किंवा दोन महिन्यांसाठी असणारा हा आहार ८- १५ दिवसातच संपतो. त्यानंतर ही महिला पोषण आहारापासून वंचित असते.
ही समस्या डोळ्यासमोर ठेवून तसेच गरजू महिलांना आवश्यक असलेल्या घटकांचा पोषण आहार मिळावा असा याद्वारे प्रयत्न आहे.यात सोयाबीन वडी, सातू पीठ,नाचणी पीठ, तसेच तूर, मसूर, मूग या डाळींचे एकत्रित पीठ व एक किलो खजूर अशा वस्तूंचे किट दोन महिने पुरेल इतके तयार करण्यात आले आले. या वस्तूंचे पीठ तयार करून दिल्यामुळे गरजू महिलाच उपयोग करू शकतील असा, विश्वास आहे. वितरण करतेवेळी हे तयार करण्याची रेसिपीही समजावून सांगण्यात आली.
या अभियानास त्या – त्या गावातील अंगणवाडी सेविकांचे सहकार्य लाभले. या अभियानासाठी चाईल्ड लाईनचे समन्वयक भानुदास येवलेकर, समुपदेशिका वृषाली जोशी, टीम सदस्य कुणाल शुक्ल, रोहन सोनगडा, संजीवनी सावळे, प्रसन्न बागल, सामाजिक कार्यकर्ते चैताली पाटील, शिवानी महाजन, नेहा कारोसिया यांनी परिश्रम घेतले.