नवी दिल्ली : देशातला मोठा सण दिवाळीच्या तोंडावर विविध राज्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. काही राज्य सरकारांनी दिवाळीसाठी बोनसची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे ती हरयाणा सरकारने. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रीम बोनसची रक्कम थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे १८००० आणि १२००० रुपये मिळणार आहेत. याचा राज्य सरकारवर ३८६.४० कोटी रुपयांचा ताण पडणार आहे.
मध्य प्रदेश सरकारनेही ४.३७ लाख कर्मचाऱ्यांना बोनस आणि थकबाकी देण्याची घोषणा केली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील तिसऱ्या हप्त्याची २५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळेल.
कर्मचाऱ्यांना लाभ
केंद्र सरकारनेही दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ३० लाखांपेक्षा अधिक राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.