जळगाव, प्रतिनिधी । आगामी सणासुदीचा व गर्दीचा हंगाम लक्षात घेता प्रवाशांकडून मोठया प्रमाणात खाजगी कंत्राटी बसेसचा वापर करण्यात येतो. प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतूकीची ने-आण करणाऱ्या वाहतूकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. अशा खाजगी कंत्राटी वाहनांच्या भाडेदरासंदर्भात मा. उच्च न्यायालय, मंबई येथे जनहित याचिका क्र. 149/2011 दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने खाजगी कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचे आदेश शासनास दिले होते.
राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरुपाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रती किलोमीटर भाडेदराच्या 50% पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णय क्र. एमव्हीआर-0412/प्र.क्र.378/(पु.बा.07) परि.2 दि. 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित करण्यात आले आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, यांचे दिनांक 25 ऑक्टोबर, 2021 च्या ठराव क्र.02/2021 नुसार एस.टी.महामंडळाच्या प्रवासी बसेसकरीता असलेल्या भाडेदरामध्ये 17.17% वाढ करण्यात आलेली आहे.
जळगाव शहरातून खाजगी बसेस या पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. या कार्यालयाव्दारे खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना प्रवशांकडून किती भाडे आकारावे याबाबतचा तक्ता तयार करुन प्रवाशांच्या सोयीकरीता प्रत्येक खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात फलक लावणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांचा माहितीकरिता या तक्त्यात नमुद असलेल्या भाडेदरास एकुण आसनक्षमतेने भागीतले असता प्रती आसन, प्रती प्रवाशी असा भाडेदर निश्चीत करता येईल.
तरी कोणत्याही खाजगी वाहतूकदाराकडून (खाजगी ट्रॅव्हल्स) कंपनीकडून महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांचे शासन निर्णय क्र. एमव्हीआर -0412/प्र.क्र.378/ (पु.बां.07)/परि.2 दि. 27 एप्रिल, 2018 अन्वये निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्याबाबत तक्रार mh१९@mahatranscom.in व dycommr.enf२@gmail.com या संकेतस्थळावर करावी. तसेच अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वाहतूकदारावर मोटार वाहन कायदा 1988 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधित नागरिक व खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूकदार यांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.