मुंबई – मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राने दावा केल्याने सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आलं आहे. राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्राने जागेवर दावा केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर राज्य सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा संतप्त सवाल विचारला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र”.
दरम्यानच्या काळात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो कारशेडसाठी ४३.७६ एकर जागेची मागणी केली होती. त्यावेळी संयुक्त मोजणी करण्याची सूचना केंद्र सरकारने प्राधिकरणास केली होती. मात्र आता त्यातील परस्पर १०२ एकर जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अयोग्य आणि अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्याची मागणी महापात्रा यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी केंद्राचा दावा अमान्य केला. तसेच ही जागा राज्य सरकारच्याच मालकीची असल्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांनी सांगितले.
‘‘कांजूरची जागा राज्य सरकारचीच आहे, हे महसूल विभागाच्या जुन्या नोंदींवरून स्पष्ट होतं. ही जागा कारशेडला देण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन नोंदीची सर्व कागदपत्रं, जुन्या नोंदी तपासून खातरजमा केलेली आहे. त्यामुळे आधी जाहीर झाल्याप्रमाणे मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथेच उभारण्याचे काम सुरू राहील’’, असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या विकासात केंद्राचा हस्तक्षेप निंदनीय असल्याची प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. मेट्रोचे काम थांबविण्यासाठी भाजपकडून कटकारस्थान सुरू आहे, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.