यावल, प्रतिनिधी । गोंदिया येथे जाणारा ३० टन रेशन तांदूळाचा साठा यावल पोलिसांनी भरदिवसा जप्त केल्याची घटना घडली.
धुळे जिल्ह्यातून कापडणे येथून अमळनेर- चोपडा- यावल- भुसावल मार्गे गोंदिया येथे जाणारा ३० टन वजनाचा तांदूळ भरदिवसा (रेशन दुकानातील तांदूळ) वाहतूक करणारा ट्राला यावल मार्गे जात असल्याची गोपनीय खबर पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्याने त्यांनी ए.एस.आय मुजफ्फर खान, पो. कॉ. सुशिल घुगे, पोलीस वाहन चालक गणेश रोहील यांनी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी यावल पोलीस स्टेशन पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केशरबाग हॉटेल जवळ सदर तांदळाचा ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यात संशयास्पद रेशनचा तांदूळ असल्याच्या कारणावरून तो ट्राला यावल पोलीस स्टेशन आवारात गेल्या दोन दिवसापासून जप्त करण्यात केला आहे तसेच पुढील कार्यवाहीसाठी यावल तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी पत्र देऊन ट्राला मधील तांदूळ हा रेशनिंगचा आहे किंवा नाही याबाबतच्या चौकशीसाठी तसेच पडताळणीसाठी कळविले आहे.परंतु संबंधितां मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर राजकीय,आर्थिक, सामाजिक दबाव आणला जात असल्याने पकडल्या गेलेल्या तांदूळ मालाबाबत कार्यवाही होते किंवा याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी नो रिप्लाय झाला त्यामुळे तो तांदूळ रेशनिंगचा आहे किंवा नाही याबाबतची माहिती मिळाली नसली तरी तांदळाने भरलेला तो ट्रक यावल पोलीस स्टेशन आवारात जमा करण्यात आला आहे.हा ट्रक नंबर एम.एच.18AC-0847 चालकाने चोपडा येथील हिरा ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 30 टन वजनाचे तांदळाची बिल्टी तयार करून गोंदिया येथे नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.परंतु आता हा तांदूळ रेशनिंगचाच आहे किंवा नाही याची तपासणी व चौकशी जिल्हा पुरवठा अधिकारी हे करतील आणि काय निर्णय देतात याकडे यावल पोलिसांसह संपूर्ण जळगाव धुळे जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.
30 टन वजनाचा तांदूळ धुळे जिल्ह्यातून कापडणे येथून गोंदिया कडे जातोच कसा? कापडणे परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होते का?किंवा धुळे,जळगाव जिल्ह्यातून रेशनिंगचा तांदूळ संकलन करून तो तांदूळ गोंदिया कडे कोणत्या फॅक्टरीत रवाना केला जातो इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कोणत्याही राजकीय,आर्थिक दबावाला बळी न पडता निपक्ष पणे चौकशी कार्यवाही करून अवैध तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक,मालकावर तसेच चोपडा येथील ट्रान्सपोर्ट चालकाने बनावट बिल्टी तयार करून दिली म्हणून कडक कारवाई करावी असे सुद्धा बोलले जात आहे.