जळगाव, प्रतिनिधी । शहरातील एम जे महाविद्यालयाजवळ असलेल्या एका मेडिकल ला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याप्रकरणी दहा लाखांचे औषधी जळून खाक झाले. यात कोणालाही जीवितहानी झालेली नाही.
शहरातील एम जे महाविद्यालय परिसरातील समर्थ कॉलनीत रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता वेणू फार्मसी या मेडिकलला आग लागली. यात आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाचे बंब तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मेडिकलचे मालक मिलिंद आनंद चौधरी (रा. दांडेकर नगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा अकरा वाजता मेडिकलमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली बाहेर धूर व आगीचे लोळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी एकाच वेळी अग्निशमन दल व चौधरी यांना फोन करून माहिती दिली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले.
पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाचे युसूफ पटेल, निवांत इंगळे, मोहन भाकरे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, राजमल पाटील आदींनी आग विझवली. वेळीच आग विझविण्यात आल्याने शेजारील दुकानांचे नुकसान झाले नाही. बारा वाजेपर्यंत दुकानातून धूर निघतच होता. दरम्यान, रामानंद नगर पोलिसांना यासंदर्भात कुठलीही माहिती मिळालेली नव्हती.