जामनेर, प्रतिनिधी । ‘आपली आमदारकीची सहावी टर्म असून, आता यापुढे जर पक्षाने उमेदवारी दिली नाही तर मला एखाद्या चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्या’, अशी मागणी भाजपा नेते आमदार गिरीष महाजन यांनी एका चित्रपट निर्मांत्याकडे केली आहे.
जळगाव जिह्यातील जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ‘हलगट’ या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी महाजन यांनी केलेल्या विधानाने सगळेच चकीत झाले. या विधानावर बरीच चर्चाही रंगली आहे. गिरीष महाजन म्हणाले की, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीची सहावी टर्म आहे.
सलग तीस वर्षे आमदारकी भूषवल्याने पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार त्यामुळे यापुढे जर पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला निवृत्तीच घ्यावी लागेल. मग अशावेळी काय करायचे? हा प्रश्न उरेल. त्यामुळे भविष्यात आम्हालाही आपल्या चित्रपटात एखादी भूमिका करण्याची संधी द्या अशी मागणीच गिरीश महाजन यांनी हलगट चित्रपटाच्या निर्मांत्याकडे केली.
गिरीष महाजन यांनी चित्रपटात भूमिका देण्याची मागणी केल्यानंतर चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे यांनीही महाजन यांच्या या मिश्कील मागणीचा धागा पकडत, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन, असे सांगताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.