जळगाव – जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणातंर्गत प्राप्त झालेल्या १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते आज बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन या रूग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णवाहिका चालकांना किलोमीटरऐवजी फेरीनुसार वेतन देण्याची मागणी मान्य करून त्यांना दिलासा दिला.
जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ तर आज 12 रूग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले असून या रूग्णवाहिका रूग्णसेवेत रूजू झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि रूग्णवाहिका चालकांना चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले.
या रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा राणे – पाटील, आतिष सोनवणे, यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.
रूग्णवाहिका चालकांना पालकमंत्र्यांचा दिलासा
या लोकार्पण कार्यक्रमात रूग्णवाहिका चालकांनी आपली समस्या पालकमंत्री श्री. पाटील यांचेकडे मांडली. ज्यात आजवर रूग्णवाहिका चालकांना वेतन हे प्रति किलोमीटरच्या दराने प्रदान करण्यात येत होते. मात्र त्यांना फेरीनुसार वेतन मिळावे अशी मागणी चालकांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती जाणून घेतली व त्यांची समस्या सोडविली.