जळगाव – किडनाशक उर्वरित अंश व किड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी अपेडाने निर्यातक्षम बागांची नोंदणी करणेसाठी ग्रेपनेट, मॅगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसीत केलेल्या आहेत. याअंतर्गत शेतकरी नोंदणी व नुतनीकरणासाठी अपेडाने विकसीत केलेल्या सुधारीत मानक पध्दतीमधील ॲनेक्झर-1 नुसार ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचेकडे विहित प्रपत्रात अर्ज सादर करावे लागतात.
यावर्षी राज्यात निर्यातीस चालना देण्यासाठी मोठया प्रमाणात निर्यातक्षम बागांच्या नोंदणीचा लक्षांक कृषि विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेला आहे. सध्या देशात कोविड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना कृषि विभागाकडे जाणे-येण्याच्या अडचणीपासून मुक्त करण्याचे निश्चित केले आहे. फलोत्पादन विभागाने अपेडा कार्यालयामार्फत फार्म रजिस्ट्रेशन कनेक्ट मोबाईल ॲपव्दारे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी राज्य पातळीवर दिनांक 24 ऑक्टोबर, 2020 रोजी सर्व संबंधित अधिकारी, सहभागी संस्था व प्रगतीशील शेतकऱ्यांची वेबिनारव्दारे कार्यशाळा घेतली.
या कार्यशाळेमध्ये निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी ॲड्राईड मोबाईल ॲपमध्ये गुगल प्ले स्टोअरव्दारे अपेडाने विकसीत केला आहे. फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी https//playgooglecom/store/apps/detailsid-in gov apeda.apedaapp या लिंकवर क्लिक करावे. त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीत स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड नंबर व ईमेल आयडी आदि माहिती भरल्यानंतर शेतकऱ्यांना नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध होत आहे.
राज्यातील फलोत्पादन शेतकऱ्यांनी त्यांचेकडील निर्यातक्षम बागांची नोंदणी अपेडाने विकसीत केलेल्या फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ॲपव्दारे करावी. आपणाकडील जास्तीत जास्त कृषि उत्पादित मालाची निर्यात करावी. याप्रकरणी काही अडचणी आल्यास जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. यावर्षी विहीत मुदतीत बागांचे नोंदणी/नुतनीकरण करणेसाठी मोबाईल ॲपचा वापर करावा. असे आवाहन संचालक, फलोत्पादन यांनी केले आहे.