चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील एक प्रमुख समस्या असणाऱ्या स्टेशन रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील गेल्या काही दशकांपासून साफ न झालेली गटार तसेच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबणाऱ्या व खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती नुकतीच आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने करून घेतली. या समस्येचा येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांसह आजूबाजूच्या व्यापारी बांधवांच्या व्यवसायावर देखील मोठा परिणाम होत होता. आज स्टेशन रोडवरील सर्व व्यापारी बांधवानी आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या जनसेवा कार्यालयात भेट घेतली व समस्या मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी कापड आणि रेडिमेड असोसिएश व पुष्पराज गारमेंट्सचे संचालक प्रीतेश भाऊ कटारिया, करवा प्रोव्हिजन चे राहुल भाऊ करवा, जैन प्रोव्हिजनचे हरीशभाऊ जैन, सौराष्ट्र उपहारगृह मंगेश खलाले, मयुर कापड दुकानचे संचालक गणेशभाऊ बागड, श्रीकृष्ण डेअरीचे प्रकाश तात्या शीनकर, अशोक टी डेपोचे राहुल बागड, विनोद प्रोव्हिजन अजय मीलानी, सुविधी मोबाईलचे श्रेणीक सोलंकी, योगेश्वरी ट्रेडर्सचे पप्पू वाणी व इतर व्यापारी बांधव तसेच भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, उपखेडचे लोकनियुक्त सरपंच महेश मगर, भाजपा शहर सरचिटणीस योगेश खंडेलवाल, नीलकंठ मगर, कैलास नाना पाटील आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनांच्या कामामुळे रस्ते सुधारणा करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्यात मात्र केवळ शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही, आपली देखील काही सामाजिक जबाबदारी आहे या नात्याने मी केवळ माझे कर्तव्य पार पाडले असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी तसेच शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या व्यापारी वर्गाला चांगल्या वातावरणात आपला उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.