जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषद समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत असणार्या जि.प.शाळांमधील इयत्ता १ली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश दिला जातो. मात्र, मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने निधी मंजूर असूनही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करता आला नाही. यावर्षी कोरोनाची लाट ओसरल्याने ४ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा सुरु झाल्या आहेत. सन २०२१- २२ यावर्षासाठी ९ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झालेला असून १ लाख ५८ विद्यार्थी-विद्यार्थिनी गणवेश मिळणार आहे.
दरवर्षी शासनाकडून जि.प.समग्र शिक्षा अभियानातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिला जातो. एका गणवेशासाठी ३०० रुपये तर दोन गणवेशासाठी ६०० रुपये याप्रमाणे जिल्ह्यातील १ हजार ८२६ जि.प.शाळांमधील १ लाख ५८ विद्यार्थी-विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र असून त्यांना या गणवेशाचा लाभ मिळणार आहे. त्यात जिल्ह्याभरातील सर्व मुली,एस.सी मुले, एसटी मुले आणि बीपीएलधारक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
मागीलवर्षी गणवेशा विना विद्यार्थी
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील शाळा बंद होत्या. त्यामुळे मागील वर्षी या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देता आलेला नाही. परिणामी या योजनेसाठी उशिर झालेला असल्याने शासनाकडून ४ कोटींना निधी मंजूर केलेला होता. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश देण्याचे नियोजन होते. मात्र,वर्ष उलटूनही शाळा उघडल्या नसल्याने हा निधी पडून होता.
शाळा व्यवस्थापनाकडे अधिकार
एका विद्यार्थ्यासाठी ३०० रुपये असे दोन गणवेशासाठी ६०० रुपये प्रमाणे अनुदान शासनाकडून मंजुरी करण्यात आलेली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिंना गणवेश वाटपाचे अधिकार शाळा व्यवस्थापनाकडे राहणार असून त्यांनीच प्रत्येक विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचे माप देवून शिवून देण्याची जबाबदारी राहणार आहे.