जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता बदलताच गैरप्रकारांना सुरुवात झाली आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी कक्ष क्रमांक १३ मधील महिला रुग्णाला रक्त मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. दरम्यान, उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे कार्यकर्ते मुकेश पाटील यांना माहिती पडताच त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सूचित केले. त्यामुळं संबंधितावर कारवाई करता आली. दरम्यान, हा संशयित जामनेर येथील होता, मद्याच्या नशेत असल्याने त्याला दम देऊन सोडले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाविरहित रुग्णसेवा सुरु आहे. रुग्णांना उपचारासाठी दररोज रक्ताची गरज भासत असते. रक्तपुरवठा हा रुग्णालयातील रक्तपेढीतून अथवा उपलब्ध नसल्यास बाहेरून केला जात असतो. कक्ष क्रमांक १३ येथे पिंप्राळा येथील एका महिला रुग्ण दाखल आहे. त्यांना उपचारासाठी रक्ताची गरज होती. संशयित व्यक्तीला माहिती पडल्यावर त्याने नातेवाईकांना संपर्क करून रक्त मिळवून देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी हा प्रकार पिंप्राळाचे नगरसेवक तथा उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे पीए मुकेश पाटील यांना सांगितले. मुकेश पाटील यांनी रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल यांना माहिती दिली. संदीप बागुल यांचेसह कक्षातील परिचारिका, कर्मचारी यांनी संशयित व्यक्तीला बोलावून घेत खडसावले. सुरक्षारक्षकांना बोलावत त्याच्यावर कारवाई केली.
तसेच त्याला, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. मद्याच्या नशेत असल्याने पोलिसांना तो व्यवस्थित माहिती देत नव्हता. जामनेर येथील असल्याचे सांगत होता. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी त्याला दम देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले. मात्र , या घटनेमुळे शासकीय रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उमटले आहे. शिस्तप्रिय डॉ. रामानंद यांच्यानंतर अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी एकतर्फी पदभार घेतल्यानंतर रुग्णालयात अपप्रवृत्ती सक्रिय झाल्या की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.