जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सेंट्रल फुले मार्केटमधील कंट्रोल रूममधील केबल जळाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल ६४ तासांनी म्हणजेच रविवारी चाैथ्या दिवशी सुरळीत सुरू झाला.
गुरुवारी मध्यरात्री एक वाजता कंट्रोल रूममधील नऊ केबल जळाल्या होत्या. महावितरणच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही जोडणी पूर्ण होत नव्हती. परिणामी मार्केटमधील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होता. केबल जळाल्याने संपूर्ण फुले मार्केट तीन दिवसांपासून अंधारात होते. कर्मचाऱ्यांनी शुक्रवार व शनिवारी पाच ते सात केबल जोडल्या. मात्र, जळालेल्या केबल अधिक लांब असल्याने त्या बदलण्यासह जोडण्यास अनेक अडचणी आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेदरम्यान काम पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत झाला. सहायक अभियंता राहुल गोवे यांच्या मार्गदर्शनाखाली सीनिअर टेक्निशियन दिनेश बडगुजर, संदीप अत्तरदे, गणेश पाटील, अक्षय बडगुजर, हेमंत राठोड यांनी ही जोडणी केली. दरम्यान, गेल्या चार दिवसांत व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागल्याने राेष वाढला अाहेे.