जळगाव, प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरात दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून तणाव कायम आहे. शहरातील खंडेराव नगर परिसरात असलेल्या आझाद नगर भागात आज सायंकाळी शनिवारचा बाजार होता. बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास वाद झाला. एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली.
दोन्ही गटातील वाद वाढल्याने काही वेळाने दोन्ही कडील गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली.
घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक पोहचले असून संशयितांची धरपकड सुरू आहे.