जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश केल्याने जळगावत भाजपला गळती लागली आहे. एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत काल सोमवारी भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
याच पाश्र्वभूमीवर खडसेंकडून सुरु असलेल्या या पक्षबांधनीबाबत भाजपचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंना टोला लगावला.
गिरीश महाजन म्हणाले कि, “पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे-गवशे आहेत तेच जातील”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला. “राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील”.