मुंबई, वृत्तसंस्था । कोरोना ओसरत असल्याने थाळीचा भाव पूर्वपदावर कोरोनाकाळात लॉकडाऊनमध्ये गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय व्हावी या हेतूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध करून दिली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवभोजन थाळी दर पूर्वीप्रमाणे दहा रुपये प्रतिथाळी इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून थाळीसाठी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. अनेकांचे रोजगार गेले होते. परगावी राहणाऱ्या तसेच हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे खाण्याचे हाल होत होते. याच काळात महाराष्ट्रातून लाखो परप्रांतीय मजुरांनी पायी आपल्या गावाची वाट धरली होती. त्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी गरजूंसाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता.
दहा रुपयांना मिळणारी ही थाळी या काळात मोफत उपलब्ध करून देण्यात आली. दिवसाला दोन लाखांपर्यंत थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. शिवभोजन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली होती. मोफत थाळी योजनेला सातत्याने मुदतवाढही देण्यात आली. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा थाळी दहा रुपयांना देण्यात येणार आहे.
लाॅकडाऊन काळात शिवभोजन केंद्रांवर थाळी पार्सल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. मात्र आता हॉटेलमध्ये बसून खाण्याची परवानगी असल्याने शिवभोजन केंद्रांवर पार्सल सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवारी जारी केला.