जळगाव, प्रतिनिधी । गेल्या महिनाभरापासून चाळीसगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नदी किनाऱ्यावरील नागरीक तसेच व्यापारी, व्यावसायिकांना कोट्यावधी रुपयांचे नुकसानीस सामोरे जावे लागले होते. शहरातून जाणाऱ्या डोंगरी व तितूर नदीच्या प्रवाहाला दयानंद ते सदानंद पुलामुळे बंधाऱ्याचे स्वरूप आले होते. कमी उंची आणि पुलाखालून कमीत कमी मोऱ्या असल्याने पाणी अडवले जात असल्याने हे पाणी गल्लीबोळात जाऊन व किनाऱ्यावरील व्यापारी आस्थापनांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचत होते. गेल्या पाच पुरांमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान शहर व तालुक्यात झाले होते. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही वस्तुस्थिती सांगितल्याने ना.गडकरी यांनी तात्काळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून पुलाला मंजुरी दिल्याने लवकरच पुलाच्या निविदा प्रसिद्ध होवून बांधकामाला सुरुवात होणार असून नामदार गडकरी साहेबांनी चाळीसगाव करांसाठी मोठी भेट दिली असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे.
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. हरीश दवे यांच्या घाटरोडवरील घरापर्यंत चा महामार्गदेखील नव्याने बांधला जावा. यासाठी ना.गडकरीसाहेबांना विनंती केली होती.शहरातून जाणारा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर व्यापारी व्यावसायिकांचे दुकाने असून शहरातील सर्वाधिक वावर या रस्त्यावर होत असल्याने हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून मजबूत तयार व्हावा जेणेकरून शहरवासीयांची कायमची समस्या सुटेल. अशी वस्तुस्थिती मांडत विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गडकरीसाहेबांकडे केली होती. या अनुषंगाने केंद्रीय रस्ते मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी वन टाइम इंप्रूमेन्ट अर्थात तातडीच्या सुधारणा करण्याच्या आदेश दिल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापासून ते घाट रोड बायपास पर्यंतचा हा रस्ता नव्याने होणार असल्याने शहरवासीयांची दैनंदिन समस्येतून सुटका होणार आहे.
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी या दोन्ही समस्यांबाबत तातडीने पाठपुरावा करीत दोन्ही महत्वाचे विषय मंजूर करून घेतल्याने शहरातील महत्वपूर्ण समस्या सुटली असल्याने व्यापारी, व्यावसायिक व शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांचे विकासाच्या धडाडीचे शहरवासीयांकडून कौतुक होत असून सोशल मीडियावर खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
आधी पुतळा आणि आज रस्त्याचे काम मार्गी
गेल्या दोन दिवसांपूर्वी रविवारी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या भक्कम पाठपुराव्यातून गेल्या 40 वर्षांपासून प्रतीक्षा असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नियोजित जागेवर बसवण्यात आला या घटनेला दोन दिवस पूर्ण होत नाही तोवर खासदार उन्मेश दादा पाटील यांनी शहरातील महत्त्वाच्या दोन्ही समस्या मार्गी लावल्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या धडाडीचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.