जळगाव प्रतिनिधी – ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे.
चित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात आहे.
तसेच बद्रीनारायण, संभाजी कदम, ग.ना.जाधव यासारख्या दिवंगत चित्रकारांनी रेखाटलेली सुबक चित्रे नव्या पिढीला कळावीत यासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यासह ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, श्रीकांत जाधव, विजयराज बोधनकर, प्रतिमा वैद्य, कैलास संन्याल या प्रसिद्ध कलावंतांच्याही कलाकृती यामध्ये आहेत. कलाक्षेत्रातील मान्यवरांसोबत जळगावमधील चित्रकार राजू बाविस्कर, शाम कुमावत, यशवंत गरूड यांच्यासह जैन इरिगेशनच्या आर्ट विभागातील चित्रकार विजय जैन, आनंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा कलाकृती बदलापूर आर्ट गॅलरीमध्ये अवतरल्या आहेत. जळगावमधील कलावंतांसाठी ही बाब भूषणावह आहे. मंगलमूर्तीच्या विविध रूपांच्या रंगरेषांच्या गणेश कलाकृतींचे प्रदर्शन दि.9 ते 25 सप्टेंबरपर्यंत पाहता येणार असून सायंकाळी 5 ते 9 यावेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.