पाचोरा – येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व तेजोदीप नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. पाचोरा भडगाव येथील सुमारे 50 पत्रकारांनी या शिबीराचा लाभ घेतला.
येथील रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील संचलित तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त तेजोदीप नेत्र रुग्णालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी खास पत्रकारांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट चे उपप्रांतपाल राजेश मोर, जेष्ठ सदस्य भरत काका सिनकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण पाटील, रोटेरियन चंद्रकांत लोढाया, डॉ. गोरख महाजन, डॉ. अमोल जाधव, रो. निलेश कोटेचा, रो. पवन अग्रवाल डॉ.पवनसिंग पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, रो. अतुल शिरसमणे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. सचिन चौधरी, रावसाहेब बोरसे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बाळकृष्ण पाटील यांनी तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या अकरा वर्षाच्या कारकीर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर केला. समाजातील पत्रकारांची भूमिका व रोटरी क्लबच्या बातम्यांना मिळणारी प्रसिद्धी या बाबत त्यांनी पत्रकारांचे आभार मानले यावेळी डॉ. गोरख महाजन, पत्रकार शांताराम चौधरी, अनिल बाबा येवले, यांचीही समयोचित भाषणे झालीत.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. सी. एन.चौधरी यांनी समाजातील पत्रकारांची भूमिका स्पष्ट केली व पत्रकारांसाठी पहिल्यांदाच आयोजित अशा आगळ्या-वेगळ्या शिबिरा बद्दल डॉ. बाळकृष्ण पाटील आणि रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव चे ऋण व्यक्त केले.
आयोजकांतर्फे उपस्थित सर्व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर तेजोदीप नेत्र रुग्णालयाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारातर्फे पत्रकार प्रा सी. एन. चौधरी यांच्या हस्ते तेजोदीप नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ. बाळकृष्ण पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
उद्घाटन समारंभ नंतर उपस्थित सर्व पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. या नेत्र तपासणी ला डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांचे समवेत त्यांचे सहकारी गोपाल पाटील, हर्षल अहिरे, तसेच ऑप्टिशियन संतोष पुर्सनानी व सचिन पुर्सनानी यांचे सहकार्य लाभले. सुमारे 55 पत्रकार बांधव या शिबिराला उपस्थित होते पैकी 50 पत्रकारांची नेत्र तपासणी करण्यात आली. ग्लोबल महाराष्ट्र चे संपादक व शिबिराचे प्रोजेक्ट डायरेक्टर शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.