ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. सोमवारी संध्याकाळी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून यामधील एक हल्लेखोर आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा हल्ला झाला आहे. हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी एका संशयिताला ठार करण्यात आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळीबार केला जात होता. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोळीबार होण्यास सुरुवात झाली. ऑस्ट्रिया पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याच्या तयारीत असतानाच हा गोळीबार झाला. लॉकडाउन लागू होणार असल्याने बार आणि रेस्तराँमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता असून लोकांना घऱाबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. “इतर संशयित दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या विशेष दलांना बोलावण्यात आलं आहे. शोध फक्त व्हिएन्नापुरता मर्यादित ठेवला जात नाही आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.