जळगाव, प्रतिनिधी । शहरापासून थोड्याच अंतरावर असलेले आसोदा येथील एका दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार केल्याची घटना ७ रोजीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारेकऱ्यांवर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसोदा येथे दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणार्या तरुणासह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आसोदा येथील कोळीवाडा येथे दिनेश जगन्नाथ साळुंखे (वय ३६) हा कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी दिनेश हा बाजारपट्ट्यातून दुचाकीने घरी जात असतांना, रोहित मधुकर सपकाळे हा त्याच्या दुचाकीवर बसला. यावेळी दिनेशने रोहितकडे बघितले, त्याचा राग आल्याने रोहितने वाद घातला.
हा वाद मिटल्यानंतर रोहित घरात असतांना, दिनेश याच्यासह सौरभ सपकाळे, मधुकर शंकर सपकाळे व सौरभची आई या चार जणांनी दिनेशच्या घरात प्रवेश करुन त्यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. यादरम्यान रोहित सपकाळे याने विळ्याने दिनेशच्या डोक्यावर वार केले. यात दिनेश जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या जबाबावरुन रोहित सपकाळे, सौरभ सपकाळे, मधुकर सपकाळे व सौरभची आई या चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साहेबराव पाटील हे करीत आहेत.