जळगाव – कोरोना लॉकडाऊनमध्ये टेन्ट हाऊस मंगल कार्यालय, केटरस, डेकोरेटर्स यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय करण्यासाठी शासनान परवानगी द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे देश व देशांतर्गत व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे टेन्ट, मंडप, कॅटरिंग, मंगल कार्यालय, डी.जे. साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक आदी सेवा लोक त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांची मानसिक स्थिती ढासाळली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदनात या मागण्या देण्यात आल्या आहेत.
सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मंडप, लॉन, मंगल कार्यालय, हॉलच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांच्या आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी किंवा पर्यायी ५०० व्यक्तीच्या उपस्थितीत कार्यक्रमाची परवानगी देण्यात यावी. जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करावा.
कर्मचारी निर्वाह भत्ता सामान्य होईपर्यंत सरकारने पैसे भरावे, कर्जदाराला व्याज माफ करावे व व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज सहज उपलब्ध करून द्यावेत, व्यवसायाला सबसिडी द्यावी, व्यवसाय धारकांना विशेष पॅकेज जाहीर करावे, करात सुट मिळावी या मागण्या करण्यात आल्यात. निवेदनावर संघटनेचे उपाध्यक्ष प्रितिश चोरडिया, सचिव सुनिल गुप्ता, कार्याध्यक्ष राजेश चोरडीया, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.