जळगाव प्रतिनिधी । शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जळगाव जिल्हा शिव वाहतूक सेनेचे सुलतान बेग नजीर बेग मिर्झा यांच्यातर्फे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. परिवहन आयुक्तांचे प्रत्येक तीन वर्षानंतर प्रत्येक कर्मचार्याचा विभाग बदलण्याचे आदेश असतांनाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील करवसुली अधिकारी पदावर कार्यकर चंद्रशेखर इंगळे हे एकाच कार्यालयात एकाच पदावर अंदाजे 12 वर्षापासून कार्यरत असून त्यांची बदली दुसर्या विभागात करण्यात यावी,
चंद्रशेखर इंगळे यांची पात्रता नसतांनाही 12 वर्षापासून त्यांना बेकायदेशीर पध्दतीने कर वसुली पदाची पदोन्नती तत्काळ रद्द करण्यात यावी, चंद्रशेखर इंगळे यांच्या फौजदारी स्वरुपाचे गुन्हे आहेत, त्यांची विभागीय चौकशी न करता त्यांना देण्यात आलेली नेमणुक रद्द करण्यात यावी, या मागण्यांचा जिल्हाध्यक्ष सुलतान बेग नजीर बेग मिर्झा यांनी दिलेल्या निवेदनात समावेश आहे. चंद्रशेखर इंगळे यांच्याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग, परिवहन आयुक्त यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून अनेकदा तक्रार केल्या आहेत.
मात्र तरीसुध्दा इंगळे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व इतर अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे बसचा अपघात नाहक 5 निष्पाप लोकांचा बळी गेला असून त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुलतान मिर्झा यांनी सोमवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक केले. यावेळी संघटनेचे कार्यकर्तेही उपोषणात सहभागी झाले होते.