काबूल : वृत्तसंस्था । तालिबानने मंगळवारी पंजशीर खोर्यावर विजय मिळवल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. आधी जाहीर केलेल्या मुदतीपेक्षा दोन दिवसांच्या विलंबाने हे हंगामी सरकार स्थापन झाले असून त्याचे नेतृत्व मुल्ला हसन अखुंद करणार आहेत. या सरकारमध्ये मुल्ला बरादर हे उपप्रमुख असतील. तालिबानने मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या सिराजुद्दीन हक्कानीला आता अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री बनवले आहे. हक्कानीवर अमेरिकेने बक्षीस जाहीर केले आहे.
सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानच्या उत्तर वजीरिस्तान येथील आहे. हक्कानी नेटवर्क ही दहशतवादी संघटना चालवणारा सराजुद्दीन हक्कानी उत्तर वजीरिस्तानच्या मीराम शाह भागात राहतो असे म्हटले जाते. हक्कानी नेटवर्कच्या या दहशतवाद्याचे नाव अजूनही एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.
अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे नाव जागतिक स्तरावरील दहशतवाद्यांच्या यादीत आहे.अमेरिकेने त्याच्याबद्दल माहिती देणार्याला ५० लाख डॉलर्सचे (जवळपास ३६ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.अमेरिका सिराजुद्दीन हक्कानीला आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. सिराजुद्दीनवर २००८ मध्ये जानेवारी महिन्यात काबूलमधील एका हॉटेलवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अमेरिकन लोकांसह सहा जण ठार झाले होते. अमेरिकेविरुद्ध अफगाणिस्तानात सीमेवरील हल्ल्यांमध्ये सिराजुद्दीनचा देखील सहभाग होता. याशिवाय, २००८ मध्ये अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येच्या कटात या सिराजुद्दीनचे नावही समोर आले होते.
जलालुद्दीन हक्कानीच्या मृत्यूनंतर मुलगा सिराजुद्दीन हक्कानी हक्कानी नेटवर्कचे नेतृत्व करत आहे. हक्कानी गट पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तालिबानच्या आर्थिक आणि लष्करी मालमत्तेवर देखरेख करतो. अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ले सुरू करणारे हक्कानीच होते असे काही तज्ज्ज्ञांचे मत आहे.अफगाणिस्तानातील अनेक मोठ्या हल्ल्यांसाठी हक्कानी नेटवर्क जबाबदार असल्याचे मानले जाते.