यावल, प्रतिनिधी । यावल-रावेर तालुक्यात गुटखा माफियांचे भक्कम जाळे पसरले असून याकडे जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.शासनाची बंदी असताना मागेल त्याठिकाणी गल्लीबोळात गुटखा मिळत असल्याने गुटखाबंदीचा शासनाचा आदेश कुचकामी ठरला आहे.ही अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असतानासुद्धा सरकार पक्षातर्फे फिर्यादी होऊन पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला आहे.
काल ६ सप्टेंबर रोजी यावल-रावेर रस्त्यावरील जे. टी. महाजन इंजिनीरिंग कॉलेजसमोर फैजपूर पोलिसांनी तब्बल १५ लाख ७० हजार ८०० रुपये किंमतीचा गुटखा तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १९ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. फैजपूर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून ही धडक कारवाई केली. त्यात शहादा येथील आरोपी अरबाज खान नवाज खान पठाण, शेख जमीलोद्दीन रफीयोद्दीन, साहिल रफिक मेमन तसेच मोसिन शेख रा. अडावद असे चार आरोपी असून यातील दोन आरोपींना अटक तर दोन आरोपी फरार आहे.
या पथकात सपोनि आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, पोहेकॉ. देविदास सूरदास, पोहेकॉ. राजेश बर्हाटे यांनी पंचा समक्ष गाडी ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला.पोहेकॉ. राजेश बर्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, पो.कॉ.महेंद्र महाजन, चेतन महाजन, होमगार्ड श्रीकांत इंगळे करीत आहे.