जळगाव, प्रतिनिधी । शहरात डेंग्यूच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेच्या दप्तरी संशयितांची संख्या ५०च्या आत असली तरी प्रत्यक्षात खासगी रूग्णालयांत डेंग्यू पाॅझिटिव्हच्या रूग्णांची संख्या शेकडाेंमध्ये आहे. अशा परिस्थितीत पालिकेकडून अपेक्षित उपाययाेजना हाेत नसल्याने डेंग्यूचा प्रसार राेखण्यासाठी भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी स्वखर्चाने दाेन फाॅगींग मशिनची खरेदी करून प्रभागात धुरळणी सुरू केली आहे.
काेराेनाचा संसर्ग कमी हाेताच डेंग्यूचा धाेका वाढायला सुरूवात झाली आहे. त्यात काेराेनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगीतले जात अाहे. दरम्यान, काही दिवसांपासून दरराेज डेंग्यूच्या संशयीत रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. पालिका प्रशासनाच्या साधन सामुग्रीची संख्या लक्षात घेता संपूर्ण शहरात धुरळणी करणे अवघड असल्याने भाजपचे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी नुकतेच दाेन फाॅगींग मशिन खरेदी केले आहेत. या मशिनच्या माध्यमातून कार्यकर्ते प्रभाग क्रमांक १३ मध्ये तीन दिवसांपासून धुरळणी करीत आहेत. नागरीकांना डेंग्यूच्या डासांचा प्रतिबंध करण्यासाठी जनजागृतीही ते करीत आहेत. लवकरच प्रभागात घराेघरी डेंग्यूपासून बचावासाठी त्यांच्या माध्यमातून जनजागृतीपर पत्रके वाटप केले जात आहे. नागरीकांच्या मागणीनुसार मराठेंकडून धुरळणीचे नियाेजन केले जात आहे.